अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा आल्यापासून तिथली परिस्थिती ही बिकट झाली आहे. तालिबान महिला आणि मुलांना याचा सगळ्यात जास्त त्रास होत आहे. लोक अफगाणिस्तानमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातून तालिबानी लोकांवर टीका होत आहे. मात्र, काही भारतीय तालिबानी राजवटीचे कौतुक करत आहेत. त्यावर आता बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली आहे. नसीरुद्दीन यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर निशाणा साधला आहे.

नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ ‘द महाराष्ट्रा न्यूज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत त्यांनी भारतीय इस्लाम आणि जगातील इतर इस्लाममधला फरक सांगितला आहे. ‘तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्याने काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहेत हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे,’ असे नसीरुद्दीन म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘भारतीय इस्लाम हा जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि देवाने ती वेळ आणायला नको पाहिजे जिथे ते खूप बदलतील आणि आपण त्याला ओळखूही शकणार नाही. आज भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची? मी हिंदुस्तानी मुस्लीम आहे आणि मिर्झा गालिब यांनी खूप आधी म्हटल्याप्रमाणे, माझा देवाशी संबंध हा अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.’

Story img Loader