गेल्या आठवड्यात हिंदी सिनेष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं होतं. अनेक कलाकारांप्रमाणेच नसीरुद्दीन शाहदेखील दिलीप कुमार यांचे चाहते आहेत. मात्र असं असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार यांच्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन शाह याचं मत वेगळं असून त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मांडलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ साठी नुकत्याच लिहिलेल्या लेखात नसीरुद्दीन यांनी खळबळजनक सवाल उपस्थित केले आहेत. ” दिलीप कुमार यांनी एक दिग्गज कलाकार असूनही हिंदी सिनेमा किंवा नवोदितांना पुढे जाण्यासाठी खास योगदान दिलेलं नाही.” असं नसीरुद्दीन यांनी या लेखात म्हंटलं आहे.

पुढे त्यांनी लिहिलं, “दिलीप कुमार यांनी अभिनयात नाट्यमय अभिनय, कडक आवाज आणि सतत हातवारे करणं या मापदंडांचं पालन केलं नाही. दिलीप कुमार यांनी त्यांची एक स्टाइल तयार केली. त्यांच्या या शैलीचं त्यानंतर आलेल्या अनेक कलाकारांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांना फारसं जमलं नाही.”

dilip-kumar-madhubala-mughal-e-azam
(File Photo)

हे देखील वाचा: ‘गुडबाय’ सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल; बिग बी आणि रश्मिका मंदानाचा लूक चर्चेत

“दिलिप कुमार यांनी अभिनयाशिवाय काही केलं नाही”

दिलीप कुमार यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल नसीरुद्दीन या लेखात म्हणाले, “ज्या जागी दिलीप कुमार होते तिथे असूनही त्यांनी अभिनयाशिवाय आणि त्यांना आपुलकी असलेल्या ठराविक सामाजिक कार्यात सहभागी होण्यापलीकडे काही केलं नाही.” असं परखड मत नसीरुद्दीन शाह यांनी मांडलं आहे. दिलीप कुमार यांनी फक्त एका सिनेमाची निर्मिती केली आणि ऑफिशली एकाही सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं नाही असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.”दिलीप कुमार यांनी कधीही आपल्या अनुभवांचा पुढच्या पिढीला फायदा करून दिला नाही. त्यांनी कुणाचीही दखल घेतली नाही. शिवाय १९७० सालातील सुरुवातीचे सिनेमा वगळता त्यांनी येणाऱ्या अभिनेत्यांसाठी खास आदर्श निर्माण केला नाही.” असं नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या लेखात म्हंटलं आहे.

दिलीप कुमार हे देशातील सर्वात महान व्यक्तींपैकी एक होते. केवळ त्यांच्या सहभागामुळेच सिनेमा लोकप्रिय ठरत होते. एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता असतानाही त्यांनी खास असं काही केलं नाही असं नसीरुद्दीन आपल्या लेखात म्हणाले आहेत.