सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणारी ‘द कपिल शर्मा शो’ ही विनोदाची मैफल प्रेक्षकांच्या आवडीची आहे. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे गेल्या अनेक वर्षांपासून कपिल शर्माच्या या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतात. शोमध्ये सिद्धूही तुफान विनोद आणि शेरोशायरी करताना दिसतात. या शोसाठी सिद्धू यांना किती मानधन मिळते हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या शोमधून सिद्धू किती कमावतात याची माहिती नुकतीच एका वेबसाइटवर आली असून आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी ही बातमी पसरत आहे.

कपिलच्या शोसाठी सिद्धू यांना मिळणारी रक्कम सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. एका वेबसाइटवर आलेल्या माहितीनुसार त्यांना वर्षाला २५ कोटी रुपये मिळतात. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे सध्या सुमारे ४५.९१ कोटींची संपत्ती आहे. ४४ लाखांचे घड्याळ, दोन लँड क्रूजर, एक मिनी कूपर कार आणि १५ लाख रुपयांचे दागिने त्यांच्याकडे आहेत.

वाचा : गणेश आचार्यचे अदनान सामीच्या पावलावर पाऊल

काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले सिद्धू सध्या पंजाबमध्ये मंत्रिपदावर आहेत. सिद्धूंना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर कॉमेडी नाईट्स या शोमधील सहभागावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसमधील नेत्यांनीही सिद्धूंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत कॉमेडी नाईट शो सोडणार नाही असे सिद्धूंनी स्पष्ट केले होते. ‘माझा सुखबिर सिंग बादल यांच्यासारखा बस व्यवसाय नाही. मी भ्रष्टाचारातही सहभागी नाही,’ असे प्रत्युत्तर त्यांनी त्यावेळी दिले होते. महिन्यातील चार दिवस तेदेखील संध्याकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत शोसाठी काम केले तर लोकांच्या पोटात का दुखते, असा सवालही त्यांनी केला होता.