भारतात जात, धर्म हे नेहमीच संवेदनशील विषय राहिलेत. तुमचं एखाद्या विषयावर काहीही मत असो पण त्यात जर धर्माचा उल्लेख आला तर त्याला वेगळाच रंग दिला जातो. सोशल मीडियाच्या जमान्यात अशी वक्तव्य वाऱ्याच्या वेगाने पसरतात. त्यावरून होणारे वाद आणि टीका हे आजकाल काही नवीन राहिलेलं नाही. असाच काहीसा वाद गायक सोनू निगम याच्या ट्विटवरून झाल्याचा पाहायला मिळाला. लाउडस्पीकरवरून होणाऱ्या अजानबद्दल त्याने आक्षेप घेतला होता. त्याचं ते ट्विट कोणत्या धर्माविरुद्ध नसून प्रार्थनास्थळी होणाऱ्या लाउडस्पीकरच्या वापरावर होतं. पण, सोनूच्या ट्विटचा प्रत्येकाने आपल्यापल्यापरीने अर्थ लावला. काहींनी त्याला विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने व्हिडिओच्या माध्यमातून मूकपणे त्याचे मत मांडलं आहे. या व्हिडिओत तो काहीही बोलत नसला, तरी त्यातून त्याने दिलेला संदेश प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.

गुरमेहर कौरचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात तिने एकही शब्द न उच्चारता फलकांद्वारे तिचं मत मांडलं होतं. त्याचप्रमाणे ‘गँग ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता नवाजुद्दीननेही या  व्हिडिओमध्ये एकापाठोपाठ एक फलक दाखवत त्याचे मत शब्दबद्ध केलंय. शमस नवाब सिद्दीकी हा नवाजुद्दीनचा भाऊ असून त्यानेच या व्हिडिओचे दिग्दर्शन केलंय. नवाजुद्दीनने डीएनए चाचणी केल्याचे एका फलकावर लिहिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं. या चाचणीचे निकाल एकामागून एक फलकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. त्यामध्ये १६.६६ टक्के हिंदू, १६.६६ टक्के मुस्लिम, १६.६६ टक्के शीख, १६.६६ ख्रिश्चन, १६.६६ टक्के बुद्धिस्ट आणि १६.६६ टक्के जगातील इतर धर्मांचा असल्याचं फलकांवर दिसतं. पण, या व्हिडिओच्या शेवटी त्याने दाखविलेला संदेश लक्षवेधक आहे. शेवटच्या फलकावर त्याने लिहिलंय की, जेव्हा मी माझ्या आत्म्याचा शोध घेतला तेव्हा त्यात मी १०० टक्के कलाकार असल्याचं आढळलं.

गेल्या काही काळापासून धर्माच्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टीलाही सतत लक्ष्य केलं जातं. कलाकारांविरोधात फतवा काढला जातो, चित्रपटांवर बंदी आणली जाते. ज्या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले नाही त्याच्या कथेवरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना राजस्थानमध्ये नुकतीच मारहाणही करण्यात आली होती.

नवाजुद्दीनने शेअर केलेला व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधणारा आहे. कोणत्याही धर्माला किंवा संस्थेला लक्ष्य न करता आपण निव्वळ एक कलाकार असल्याचे त्याला सांगायचे आहे, हेच या व्हिडिओतून दिसते.

Story img Loader