जॅकी भगनानी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि प्राची देसाई यांच्या ‘कार्बन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. १ मिनिट ३३ सेकंदाचा हा ट्रेलर आपल्याला वर्ष २०६७ मध्ये घेऊन जातो जिथे ऑक्सिजन एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे विकला जातो. आपलं भविष्य दर्शवणाऱ्या ‘कार्बन-अ स्टोरी ऑफ टुमारो’ या चित्रपटात देश आणि जगातील गंभीर समस्या असलेला प्रदूषण हा मुद्दा उचलला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे कशाप्रकारे पृथ्वीवर ऑक्सिजनची कमतरता भासते हे ट्रेलरमध्ये दाखवलंय. अखेर एक वेळ अशी येते जेव्हा ऑक्सिजन सिलिंडरमध्ये एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे विकावं लागतं. एका भयानक भविष्याचं सत्य यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. भविष्यात खरीच अशी परिस्थिती निर्माण झाली तर कसं जगायचं हा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उदभवतो.

वाचा : प्रार्थनाला सापडला तिचा ‘मितवा’

नवाजुद्दीनच्या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते ज्यामध्ये तो म्हणतो की, ‘जेव्हा शटलमधून खाली येतो तेव्हा पृथ्वीवर फक्त कार्बनच दिसतो.’ पुढील ५० वर्षांनंतर वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीची काय अवस्था असेल हे यातून दाखवण्यात आलंय. यामध्ये जॅकी भगनानीला कृत्रिम हृदय असलेलं दाखवलंय तर नवाजुद्दीन मंगळ ग्रहावरून परतलेल्या मनुष्याची भूमिका साकारतोय. मैत्रेय बाजपेयी दिग्दर्शित हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झाली नाही.