अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर नवाजुद्दीन सिद्दीकीने प्रश्न उपस्थित केला. “आयुष्य भरभरून जगणारा व्यक्ती, इतका हुशार व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कसा उचलू शकतो”, असं नवाजुद्दीन म्हणाला. नवाजुद्दीन व सुशांत एकमेकांच्या कामाचं नेहमीच कौतुक करायचे. सुशांतच्या चित्रपटांची निवड नवाजुद्दीनला फार आवडायची.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, “सुशांत आयुष्य भरभरून जगायचा. तो खूप बोलका होता. लोकांना बोलतं कसं करायचं हे कौशल्य त्याच्या अंगी होतं. त्याच्या शब्दांची जादू समोरच्या व्यक्तीला आकर्षित करायची. मी अनेकदा त्याला भेटलोय आणि आम्हाला एकमेकांचं काम फार आवडायचं. मी जेव्हा जेव्हा त्याला भेटायचो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा मला त्याच्या अवतीभवती जाणवायची. त्यामुळे त्याने आत्महत्या केली यावर मला विश्वास बसत नाही. आयुष्याला कंटाळून तो असा निर्णय कसा घेऊ शकतो? उलट त्याच्या इतकं भरभरून जगताना मी कोणाला पाहिलं नाही.”

सुशांतच्या चित्रपट निवडीबाबत नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “तो खूप मोठा स्टार होता. त्याने ब्लॉकबस्टर चित्रपट निवडले असते. पण डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी आणि सोनचिडियाँ सारखे चांगले कथानक असलेले चित्रपट त्याने निवडले. तो सच्चा कलाकार होता. पैसा ही त्याच्यासाठी दुय्यम गोष्ट होती.”

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचा तपास सध्या सीबीआय करत आहे.