रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्याने गर्लफ्रेंडला कानाखाली मारल्याचं सांगणाऱ्या स्पर्धकाला अभिनेत्री नेहा धुपियाने सुनावलं. या घटनेनंतर ‘रोडीज रिव्हॉल्यूशन’ हा रिअॅलिटी शो आणि नेहा चांगलेच चर्चेत आले. पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी असं म्हणणाऱ्या नेहा धुपियावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता नेहाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित ट्रोलिंगवर मौन सोडलं आहे.
नेहाने पोस्टमध्ये काय लिहिले?
मी गेल्या पाच वर्षांपासून रोडीज या शोचा भाग आहे. देशातल्या सर्व भागातील स्पर्धकांची एक टीम बनवण्याची संधी या शोने मला दिली. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून जे काही सुरू आहे, ते मला मान्य नाही. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये मी हिंसेच्या विरोधात आवाज उठवला होता. गर्लफ्रेंड आपल्याला धोका दिल्याचं एका मुलाने सांगितलं. फसवणुकीविरोधात त्या मुलाने गर्लफ्रेंडवर हात उगारला. ही गोष्ट मला चुकीची वाटली. फसवणूक करणाऱ्यांची मी साथ देत नाही, मात्र हिंसेला माझा विरोध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला हे फार दुर्दैवी आहे.
प्रत्येकाची आपली आवड-नावड असते. आपल्या आवड-नावडीनुसार जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र एखाद्याला मारहाण करणं साफ चुकीचं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माझे कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार यांना वाईट पद्धतीचे मेसेज येत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर शिव्यांचे मेसेज येत आहेत. माझ्या मुलीच्या सोशल मीडिया पेजवर अश्लील व अर्वाच्च भाषेत मेसेज लिहिले जात आहेत. मी हे अजिबात सहन करणार नाही.
महिलांसोबत होणाऱ्या हिंसेच्या मी कायम विरोधात आहे आणि असेन. एका महिलेच्या तुलनेत पुरुषाचं बळ अधिक असतं. घरगुती हिंसाचार ही फक्त भारतातील नाही तर जगभरातील मोठी समस्या आहे. जर तुम्ही हे सहन करत असाल तर आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत.
View this post on Instagram
काय आहे प्रकरण?
नेहा सध्या छोट्या पडद्यावरील ‘एमटीव्ही रोडीज’ या शोमध्ये परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच झापलं. ‘एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही’, असं नेहा म्हणाली. पाच प्रियकरांची निवड करणं हा सर्वस्वी त्या मुलीचा निर्णय आहे.’ यावरून तिला ट्रोल करण्यात आलं.