बॉलिवूडमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, इशान खत्तर, अनन्या पांडे यांसारख्या स्टार किड्सच्या पदार्पणाची चर्चा असतानाच घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजला. बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगनाने हा मुद्दा उचलला आणि नंतर अनेकांनीच त्यावर टिकाटिप्पणी केली. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कंगनाने त्याच्यावर घराणेशाहीवरून टीका केली आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान याविषयी कंगनाचं मत विचारलं असता, या मुद्द्यावर पुरेशी चर्चा झाल्याचं कंगनाने म्हटलं. आगामी ‘सिमरन’च्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमादरम्यान कंगनाने घराणेशाहीवर पुन्हा एकदा वक्तव्य केलं.

कंगनाच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात कंगनाला घराणेशाहीवर झालेल्या वादाबद्दल काही बोलायचंय का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली की, ‘या मुद्द्यावर मी ओपन लेटरही लिहिलं होतं. त्यावर खूप चांगली चर्चादेखील झाली. घराणेशाहीबाबत मी माझे सर्व मुद्दे याआधी स्पष्ट केले.’

वाचा : अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री देणारी ‘ती’ आता लाइमलाइटपासून दूर

गेल्या महिन्यात झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही या वादाचे पडसाद उमटले होते. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टीका करण्यात आलेली. त्यानंतर तिघांनीही तिची माफीदेखील मागितली. घराणेशाही ही बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मूळ धरून आहे. स्टार किड्सना इंडस्ट्रीत सहजपणे संधी मिळते तर बाहेरुन आलेल्या लोकांना फार कमी वेळा पुढे जाण्याची संधी मिळते, किंबहुना ती त्यांना अक्षरश: खेचून घ्यावी लागते,’ असं कंगनाचं म्हणणं आहे.