अभिनेत्री व मॉडेल ब्रुना अब्दुल्लाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत घरच्या घरी वॉटर बर्थ डिलीव्हरीचा अनुभव सांगितला. काही दिवसांपूर्वीच तिने पाण्यात (water birth delivery) मुलीला जन्म दिला. कोणत्याही औषधांच्या वापराशिवाय मुलगी या जगात यावी अशी तिची इच्छा होती. म्हणूनच तिने प्रसूतीसाठी हा अनोखा पर्याय स्वीकारला.

”मी गरोदर होण्याआधीच ठरवलं होतं की माझ्या बाळाची वॉटर डिलीव्हरी करणार. माझी मुलगी या जगात कोणत्याही औषधांच्या वापराशिवाय यावी असं मला वाटत होतं. यासाठी मी एका शांत ठिकाणाची निवड केली जिथे माझ्यासोबत फक्त ते लोक असतील ज्यांच्यासोबत राहणं मला आवडतं. मी फार नशीबवान आहे की मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं.

https://www.instagram.com/p/B2tmvTEgaxD/

या अनुभवाबद्दल सांगताना तिने पुढे लिहिलं की, ”माझ्या मुलीला मी कोमट पाण्याच्या पूलमध्ये डॉक्टरांच्या सहाय्याने जन्म दिला. यावेळी माझ्यासोबत पती व आईसुद्धा होती. अशा पद्धतीच्या डिलीव्हरीसाठी मी स्वत:ला खूप आधीपासून तयार केलं. शनिवारी मुलीचा जन्म व्हावा अशी माझी इच्छा होती. तसंच प्रसूतीकळा चार तासांपेक्षा अधिक जास्त नसाव्यात असंही वाटत होतं. नियमित व्यायाम, योग्य आहार, योगसाधना आणि वॉटर डिलीव्हरीबद्दलची माहिती गोळा करत मी स्वत:ला तयार केलं.”

ब्रुनाने ३१ ऑगस्ट रोजी मुलीला जन्म दिला. तिचं नाव इसाबेल असं ठेवलं. ब्रुनाने अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांच्यासोबत काम केलं. ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘देसी बॉइज’, ‘मस्तीजादे’ आणि ‘कॅश’ या चित्रपटांतून ती रुपेरी पडद्यावर झळकली आहे. गेल्या वर्षी तिने ब्रिटीश बॉयफ्रेंड एलिन फ्रेजरसोबत साखरपुडा केला. लग्नाआधी ती गरोदर राहिली.