संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस पेटत असल्याचे चित्र आहे. विविध संघटनांकडून चित्रपटाला असणाऱ्या विरोधामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र इतके दिवस होऊनही अद्याप चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे. याआधी चित्रपट फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. मात्र नुकत्याच आलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन मार्चपर्यंत लांबणीवर पडू शकते.
या चित्रपटात दाखविण्यात आलेले प्रसंग कितपत योग्य आहेत हे तपासण्यासाठी सेन्सॉर बोर्ड इतिहासकारांची एक समिती स्थापन करणार आहे. पण चित्रपटाची नोंदणी करताना चित्रपट निर्मात्यांनी एक गोंधळ केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी स्वत:च वाद आपल्यावर ओढवून घेतल्याचा आरोपही सेन्सॉर बोर्डाने केला आहे. फॉर्म भरताना पद्मावतीच्या निर्मात्यांनी चित्रपट ठराविक पातळीपर्यंत ऐतिहासिक असून पूर्णपणे तो इतिहासावर बेतलेला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा किती भाग इतिहासावर आधारीत आहे आणि किती नाही हे इतिहासकारांचे मंडळ ठरवेल.
मात्र चित्रपटाला इतक्यात प्रमाणपत्र मिळणे काहीसे कठिण झाले आहे. कारण ‘डीएनए’ने दिलेल्या बातमीनुसार, पद्मावतीच्या आधी इतर ४० चित्रपट प्रमाणपत्र मिळण्यासाठी रांगेत आहेत. याशिवाय इतिहासकारांचे पॅनेल तयार करण्यासाठीही बराच वेळ लागू शकतो. म्हणून चित्रपट मार्च महिन्याशिवाय प्रदर्शित होणार नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांना पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी आणखी किती वाट पहावी लागणार याबाबत कोणतीच ठोस माहिती अद्याप समजू शकत नाही.