मराठी चित्रपटांना हक्काची चित्रपटगृहे आणि प्राइम टाइम शो उपब्ध करुन देण्यासाठी आता काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यांसंबंधीचे ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले. “महाराष्ट्रात ‘देवा’ला मारुन ‘टायगर..’ जिवंत राहत असेल तर त्या थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही”, असे ट्विट करत त्यांनी चित्रपटगृहाच्या मालकांना इशारा दिला.

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचा मान राखला गेलाच पाहिजे, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले. नितेश राणेची ही आक्रमक भूमिका ‘देवा’ला किती फायद्याची ठरणार, याकडेच आता अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. २२ डिसेंबरला अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी मराठीतही ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत मिळणाऱ्या प्राइम टाइम शोची संख्या कमी असल्यामुळे राजकीय पक्षांकडून हा मुद्दा तापवला जाण्याची शक्यता आहे.

वाचा : मराठी चित्रपटांना प्राइम टाइम द्या- शालिनी ठाकरे

या वादात आता संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. फक्त ‘देवा’च नव्हे तर प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे, असे त्यांनी म्हटले. तर मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. राऊतांचे हे ट्विट पाहता मनसे, काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनाही या वादात उतरली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘टायगर….’मुळे मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनीच दिली आहे. प्राइम टाइम शोच्या मुद्द्यावरुन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वादाची ठिणगी पडून त्याला राजकीय वर्तुळातूनही हवा मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, नितेश राणे यांच्याआधी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्राइम टाइम शोचा मुद्दा उचलून धरत, हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही प्राइम टाइम शो उलब्ध करुन द्यावेत अशी मागणी केली होती.