दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद काही संपता संपेना. करणी सेना, राजपूर संघटना यांच्यानंतर राजकीय नेत्यांनीही या वादात उडी घेतली. चित्रपटाला वाढता विरोध पाहता आता स्वत: भन्साळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही असं सांगत ते म्हणाले की, ‘दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिकांमध्ये कोणताही संवाद दाखवलेला नाही.’

चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेत अनेकांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला. राणी पद्मावती आणि खिल्जी यांच्यात कोणताही संवाद दाखवण्यात आला नसल्याचा संदेश भन्साळी एका व्हिडिओमार्फत देणार आहेत. लवकरच हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ”पद्मावती’मध्ये अशा प्रकारचं कोणतंच दृष्य चित्रीत करण्यात आलं नसून या सर्व अफवा आहेत. राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही. या अफवा कोणी पसरवल्या हे माहित नाही. पण यामुळे दिग्दर्शक भन्साळी यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि खूप नुकसानही झाले.’

वाचा : नवाजुद्दीनने २४ तासांत माफी मागावी; सुनीताने पाठवली नोटीस

१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.