टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’मधील नवीन भाभीजी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे मालिका सोडून जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. शिल्पा शिंदेनंतर अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगीही मालिका सोडून जाणार या वृत्ताने तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

वाचा : फरहान अख्तरचे ‘ते’ स्वप्न अधुरेच

शुभांगी अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त होते. काही दिवसांपूर्वी ती एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी तिला राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मी अजूनही याबाबत संभ्रमात असल्याचे तिने म्हटले होते. यानंतर तिच्या या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि शुभांगी मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर, ही निव्वळ अफवा असल्याचे शुभांगीने म्हटलंय.

शुभांगी म्हणाली की, काही राजकीय समारंभात मी उपस्थित राहिल्याने लोकांचा कदाचित गैरसमज झाला आहे. मालिकेतही मी निवडणुकीत उभी राहणार असल्याचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे मालिकेतील माझी भूमिका आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याची सांगड घातली जातेय. मालिका सोडण्याचा माझा अजिबात विचार नाही. ‘भाभीजी घर पर है’मधून लोकांचे मनोरंजन करून मला आनंद मिळतो.

वाचा : लग्नाच्या दोन दिवस आधीच पळून गेली होती शिल्पा शिंदे?

गेल्यावर्षी मे महिन्यात निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे शिल्पाने ही मालिका सोडली होती. त्यानंतर तिच्या जागी शुभांगीची वर्णी लागली. शुभांगीने तिच्या परीने या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रेक्षकांनीही तिला अगदी कमी वेळातच अंगुरी भाभीच्या रूपात स्वीकारले.