गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने ब्लॉकबस्टर कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, त्याचसोबत या चित्रपटाने ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात निर्माण केला. याचे उत्तर दुसऱ्या भागात मिळेल असे बाहुबली चित्रपटाच्या अखेरीस सांगण्यात आले होते. ‘बाहुबली’ या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याच्या पहिल्या भागात अनुत्तरित राहिलेल्या ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटात तरी मिळणार का? यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांना माहित होते. त्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनाही याचे उत्तर कळले आहे.

वाचा: ‘बाहुबली २’ ला टक्कर देण्यासाठी अक्षय सज्ज

वाचा: ‘बाहुबली’ निर्मात्याच्या ऑफिसमध्ये आयकर विभागाचा छापा   

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला होता. यावरून सोशल मिडीयावरही विनोदांची रांग लागली होती. ४७ व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. या कार्यक्रमाला राज्यवर्धन राठोड यांच्यासह ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजमौली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी राठोड म्हणाले की, आज संभाषणादरम्यान ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ यामागचे गुपित राजमौली यांनी मला सांगितले. आमच्यासाठी असा उत्तम चित्रपट बनविण्यासाठी मी तुमचा आभारी आहे. तसेच, ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हे सांगण्यासाठीही आभार मानतो. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. सरकारला सर्व काही माहित असतं आणि कुठली गोष्ट गुपित ठेवायची हेही सरकारला माहित आहे. त्यामुळे त्यांचं गुपित आमच्याकडे सुरक्षित राहिल.

‘बाहुबली’चा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर याचा दुसरा भाग २८ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. बाहुबली ईदच्या एक आठवडाआधी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी हा सिनेमा परशुराम जयंतीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक महत्त्वाचे सिनेमे हे नाताळ, दिवाळी, ईद यांसारख्या दिवसांमध्येच प्रदर्शित होत असतात. ‘बाहुबली’ मात्र याला अपवाद ठरणार आहे.

दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘२.०’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेची अॅक्शन, वीएफएक्स इफेक्ट्स, चित्रपटातील कलाकार, संगीत आणि दिग्दर्शन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची स्टारकास्ट आणि भव्यता पाहता ‘बाहुबली २’ या चित्रपटाला ‘२.०’ हा चित्रपट चांगलीच टक्कर देणार आहे असे चित्र दिसत आहे.