प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा विश्वास

न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराप्रमाणेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो. त्यामुळे ‘न्यूड’ चित्रपटाविषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी बुधवारी व्यक्त केला. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक मराठी अकादमी आणि बी. व्ही. जी. ग्रुपतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी रवी जाधव यांच्याशी संवाद साधला.

ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिग्दर्शक-निर्मात्यांनी पुराव्यांनीशी पूर्ण अभ्यास करून काम आणि वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे. चित्रपटांमध्ये काय असावे किंवा काय नसावे हे ठरविण्यासाठी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रति सेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या बदलत्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, काही अपवाद वगळता पूर्वी चित्रपटात अभिनय किंवा पाश्र्वगायनापुरतीच महिलांची भूमिका मर्यादित होती. आता चित्रपट निर्मितीमधील सगळ्या स्वरूपाच्या कामांमध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महिलांच्या विचारांना अधिक चालना मिळत असून त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना जाधव म्हणाले, माझे वडील गिरणी कामगार होते, त्यामुळे माझी वाटचाल असेच काहीसे काम करण्याकडे होती. मात्र, स्वतविषयी विचार करताना काहीतरी वेगळे सांगण्याच्या उद्देशातून मी कला क्षेत्राकडे वळलो. सुरुवातीला मी जाहिरात क्षेत्रात संहिता लेखनाची कामे करू लागलो. त्यावेळी कामाच्या निमित्ताने बराच काळ परदेशात असताना मला फार तुटलेपण जाणवायचे. त्यावेळी पुस्तकांच्या वाचनातून मला आपली संस्कृती, कला, साहित्य याविषयी आकर्षण वाटायला लागले. नोकरी सोडून मी नटरंग चित्रपट करायचा ठरवला, त्यावेळी तमाशापट ही संकल्पना आता जुनी झाली आहे, असे मला अनेकजण म्हणाले. पण या चित्रपटातून मला काही तरी वेगळेच प्रेक्षकांना द्यायचे होते. ‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी खूप अभ्यास केला होता.

‘बालक-पालक’ या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाविषी जाधव म्हणाले, माझा मुलगा १३-१४ वर्षांचा झाल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारू लागला. लैंगिकतेविषयीच्या त्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी इंटरनेटचा आधार शोधू लागलो. त्यावेळी आपल्याप्रमाणेच परदेशातही हा विषय पाहिजे तितक्या मोकळेपणाने हाताळला जात नसल्याचे लक्षात आले. तेव्हा या विषयावर चित्रपट करताना मनोरंजनातून शिक्षण हा मार्ग मी अवलंबला. प्रत्येक चित्रपट तयार करताना मला अनेक अडचणी आल्या. पण त्यांच्यावर मात करून मी पुढे गेलो आणि त्यातूनच घडतही गेलो. तुम्ही कोणाला आणि काय दाखवू इच्छिता, यावर तुमचे यश अवलंबून असते.