‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वात स्वामी ओम हे अजब रसायन सर्वांनी पाहिलं. चर्चेत राहण्यासाठी हा माणूस काहीही करु शकतो याची प्रचिती जणू हे पर्व पाहताना येत होती. अनेकदा स्वतःहून वादात अडकून आणि प्रसंगी लोकांचा बेदम मार खाऊन स्वामी ओम चर्चेत राहतात. पण आता स्वामी ओम एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत ते कारण म्हणजे पोलिसांनी त्यांना चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. बुधवारी त्यांना दिल्ली येथील भजनपुर परिसरातून आंतरराज्य गुन्हे शाखेने अटक केली. पण ही अटक का करण्यात आली याबद्दल अधिक माहिती अजून मिळालेली नाही.

सध्या स्वामी ओम यांच्यावर सायकल चोरल्याचा, हत्यार बाळगल्याचा आणि चोरीच्या उद्देशाने दुसऱ्यांच्या घरी जबरदस्ती घुसल्याच्या आरोपावर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील लोधी कॉलनीतील सायकलच्या दुकानाचे लॉक तोडून तीन लोकांच्या मदतीने स्वामी ओम यांनी ११ सायकलची चोरी आणि दुकानातील महागडे सामान चोरल्याचा आरोप त्यांचे लहान भाऊ प्रमोद झाने याने केला होता. २०१० मध्ये हा खटला गुन्हे शाखेकडे हस्तांतरण करण्यात आला होता.

स्वामी ओम हे नाव तेव्हा चर्चेत आलं जेव्हा एका वृत्तवाहिनीवर महिलेने त्यांना मारहाण केली. हा एक लाइव्ह शो होता. या शोमध्ये राधे मां यांच्या मुद्यावर भाष्य करण्यासाठी त्यांना बोलावले होते. यात स्वामी राधे मां यांच्या बाजूने बोलत असताना त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिलेच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्या महिलेने स्वामी ओम यांना शोमध्ये बेदम मारले.