‘नच बलिये’च्या आठव्या सिझनच्या अंतिम फेरीत तीन जोड्या पोहोचल्या आहेत. यामध्ये सनाया इरानी-मोहीत सेहगल आणि अॅबीगेल पांडे-सनम जोहरसोबतच छोट्या पडद्यावरील बहुचर्चित जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचा समावेश आहे. ‘नच बलिये ८’चा किताब आपल्या नावावर करण्यासाठी दिव्यांकाने स्टार प्लसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय अशी सध्या खूप चर्चा होतेय.

एका ऑनलाईन ट्रोलने दिव्यांकाला टॅग करत ट्विटरवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘दिव्यांकाने स्टार प्लसला धमकी दिली आहे. जर नच बलियेमध्ये तिला विजेती न केल्यास ती स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका यह है मोहब्बते सोडून देईल.’ या ऑनलाइन ट्रोलला दिव्यांकानेही सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने असे लिहिले आहे की, ‘#MsBasher मी हे उत्तर तुला देत नसून तुझ्या खोट्या बातमीवर विश्वास ठेवून फसणाऱ्यांसाठी देत आहे. जिंकू किंवा न जिंकू, मी मागे हटणार नाही.’

सेलिब्रिटी जोडप्यांच्या नृत्याची झलक दिसणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक लोकप्रिय जोडप्यांनी सहभाग घेतला. विविध नृत्यशैली प्रकार सादर करत, परीक्षकांकडून चांगले गुण मिळवत आणि बाद फेऱ्यांवर मात करत अंतिम तीन जोड्यांमध्ये दिव्यांका आणि विवेक सहभागी झाले. अभिनयासोबतच नृत्यामध्येही अव्वल असल्याचे दिव्यांकाने प्रेक्षकांना दाखवून दिले.

वाचा : या लबाडासाठी इलियानाचं नेहमीच झुकतं माप असतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांका आणि ‘नच बलिये’चा हा सिझन याआधीसुद्धा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. मध्यंतरी दिव्यांका आणि सनाया इरानीच्या चाहत्यांनी जणू ऑनलाइन युद्धच सुरू केलं होतं. सोशल मीडियावर दोघींचे चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी भिडले होते. तिन्ही जोडींपैकी नक्की कोण जिंकेल हे तर प्रेक्षकच ठरवतील. मात्र दिव्यांकाने वेळीच दिलेले उत्तर चाहत्यांमध्ये पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरले.