९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लैंगिक शोषणाचा मुद्दा ठळक शब्दांत मांडल्याचं पाहायला मिळालं. ‘मी टू’ #MeToo आणि ‘टाईम्स अप’ या दोन्ही चळवळींचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला. या सोहळ्यातील आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे भगव्या रंगाचा पिन. अमेरिकेतील ‘गन कल्चर’विरोधात आवाज उठवण्यासाठी ऑस्कर सोहळ्यातील कलाकारांनी हा पिन कोटवर लावला होता.

‘पीपल डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, रेड कार्पेटवर येताना कलाकारांनी पोशाखावर भगव्या रंगाचा पिन लावला होता. अमेरिकेतील फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत एका माजी विद्यार्थ्यांने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कलाकारांनी हा पिन लावला होता.

The 2018 Oscar Winners: अँड दी ऑस्कर गोज टू…

फ्लोरिडामधील शाळेतल्या गोळीबारात १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. १४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती आणि त्यानंतर बऱ्याच सेलिब्रिटींनी ‘मार्च फॉर अवर लाइव्स’ मोहीमेत सहभाग घेतला होता.

यंदाच्या ऑस्करमध्ये हार्वी विनस्टीनविरोधात अनेकांनीच आवाज उठवत लैंगिक शोषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली. अभिनेत्री अॅशली जड आणि मिरा सोर्विनो या दोघींनी सुरुवातीपासूनच ‘टाईम्स अप’चा म्हणत सर्वांचं लक्ष वेधलं. तर ज्येष्ठ अभिनेत्री रिटा मोरेनो यांनी ५६ वर्षांपूर्वीचा ड्रेस घालत ऑस्करच्या रेड कार्पेटची शान वाढवली.