चित्रपट कलेचा आणि या कलेसाठी सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी काही पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. अशा या पुरस्कार सोहळ्यांमध्ये अग्रगणी असलेला पुरस्कार म्हणजे अकॅडमी अवॉर्ड किंवा ऑस्कर. दरवर्षी ऑस्करचा हा मानाचा पुरस्कार कोणाच्या हाती स्थिरावणार याविषयीच संपूर्ण कलाविश्वात चर्चा पाहायला मिळते. अशा या ऑस्कर सोहळ्याचा इतिहास आणि त्याविषयीच्या काही गोष्टी फार रंजक आहेत. रागरुसवे, मतभेद, अद्वितीय कला आणि ताकदीचे कलाकार अशी एकंदर रेलचेल असणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड्सचं यंदाचं हे ९० वं वर्ष. ऑस्कर वर्षानुवर्षे कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत गेला आणि त्यांच्यालेखी सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. चला तर मग, जाणून घेऊया या पुरस्कार सोहळ्याविषयीच्या काही खास गोष्टी….

*ऑस्कर पुरस्कारांचं सूत्रसंचालन करण्याची अनेकांचीच इच्छा असते. आतापर्यंत पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात बऱ्याच कलाकारांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. ज्यामध्ये बॉब होप याने सर्वाधिक १८ वेळा ऑस्करचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यामागोमाग बिली क्रिस्टल याचं नाव येतं. त्याने जवळपास ८ वेळा ऑस्करसाठी सूत्रसंचलन केलं आहे.

*अकॅडमी अवॉर्ड्स मिळवणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं. किंबहुना हे एक असं स्वप्न असतं जे त्या कलाकारांना काम करण्यासाठी सतत प्रेरित करत असतं. पण अकॅडमी अवॉर्ड्स सर्वांनाच हवाहवासा असला तरीही त्याला काही कलाकारांनी नाकारलंही आहे. डडली निकोलस याने सर्वप्रथम अकॅडमी पुरस्कार नाकारला होता. १९३५ मध्ये ‘इन्फॉर्मर’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार देण्यात आला होता. पण, तेव्हा अकॅडमी आणि रायटर्स गिल्ड यांच्यात वाद सुरु असल्यानेच त्याने हा निर्णय घेतला होता. अभिनेता जॉर्ज सी. स्कॉट यांनीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नाकारला होता. ‘टू हावर मीट परेड’ असा उल्लेख करत त्यांनी ऑस्कर नाकारला होता. तर गॉडफादर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणाऱ्या अभिनेता मार्लन ब्रँडो यांनी अमेरिकन कलाकारांकडे अकॅडमीचं झुकत माप पाहता हा पुरस्कार नाकारला होता.

*ऑस्करच्या ट्रॉफीविषयी सर्वांनाच आकर्षण वाटतं. हे मानचिन्ह म्हणजे अनेकांसाठी सर्वस्व असतं. ३४ सेंमी उंचीच्या या मानचिन्हाचं वजन ३.८५ किग्रॅ इतकं असतं. या मानचिन्हाचं स्वरूप हातात ‘क्रुसेडर्स’ तलवार घेऊ न उभ्या असलेल्या सरदाराची कलात्मक मूर्ती असं आहे. सन्मानचिन्हाच्या पायाखाली आपल्याला पाच ‘स्पोक’ (चाकाचे आरे) दिसतात. हे स्पोक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि तंत्रज्ञ यांचे प्रतिनीधित्व करतात.

वाचा : ‘ऑस्कर बाहुली’ नेमकी तयार होते तरी कशी?

*१९२९ मध्ये पहिला अकॅडमी पुरस्कार सोहळा पार पडला होता. ज्यामध्ये मानचिन्ह देऊन कलाकारांचा गौरव करण्यात आला होता. हा सोहळा अवघ्या पंधरा मिनिटांचा होता.

*२००९ मध्ये अकॅडमीने पहिल्यांदाच एका महिला दिग्दर्शकाचा गौरव केला होता. ‘द हर्ट लॉकर’ या चित्रपटासाठी कॅथरीन बिगेलो यांना हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार देण्यात आला होता.

*हॅटी मॅकडॅनिअल ही पहिली आफ्रिकन- अमेरिकी अभिनेत्री होती जिच्या हाती ऑस्करची बाहुली स्थिरावली होती. १९३९ मध्ये ‘गॉन विथ द वाइंड’ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

*अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना आतापर्यंत ऑस्करची सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत. त्यांना आतापर्यंत २१ नामांकनं मिळाली असून ३ वेळा त्यांना ऑस्करने गौरवण्यात आलं आहे.

*सुरुवातीच्या अकॅडमी अवॉर्डदरम्यान सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि अभिनेत्री या पुरस्कार विजेत्यांसाठी ऑस्करच्या बाहुलीच्या मानचिन्हाऐवजी एक दुसरे मानचिन्हं दिलं जायचं.

*ऑस्कर विजेत्यांनी पुरस्कार सोहळ्यात ४५ सेकंदांपेक्षा जास्त काळ भाषण देऊ नये असा नवा नियम २०१० मध्ये लागू करण्यात आला होता.

*१९४२ मध्ये ग्रीर गार्सन या अभिनेत्याने सर्वाधिक वेळ, म्हणजेच ५ मिनिटं २० सेकंद भाषण देत पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता.