‘पद्मावत’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसात बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करत या संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाने ११५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ‘पद्मावत’ने ३१-३२ कोटी रुपयांची तुफान कमाई केली. बुधवारी झालेल्या पेड प्रिव्ह्यूमध्ये ५ कोटी, गुरुवारी १९ कोटी, शुकव्रारी ३२ कोटी आणि शनिवारी २७ कोटींची शानदार कमाई केली आहे. देशभरातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने कमाल केली आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’ने परदेशातही अपेक्षेहून अधिक कमाई केली आहे.

उत्तर अमेरिका, न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली २’, आमिर खानच्या ‘पीके’ आणि ‘दंगल’ यांचाही विक्रम मोडला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्याअखेर ४,७८०,२३९ डॉलर म्हणजेच ३० कोटी रुपयांचे कलेक्शन करत ‘पद्मावत’ उत्तर अमेरिकेत बॉलिवूडचा नंबर वन चित्रपट ठरला आहे. येथे ‘पीके’ आणि ‘दंगल’चा विक्रम मोडला आहे. तर ऑस्ट्रेलियात १,६२२,३०९ डॉलर म्हणजेच जवळपास साडेआठ कोटींची कमाई करत ‘पद्मावत’ने ‘बाहुबली २’ला मागे टाकले.

20 YEARS OF CID: ‘सीआयडी’ टीमने रचलेला हा विक्रम माहित आहे का?

करणी सेनेकडून झालेला तीव्र विरोध आणि चित्रपटावरून झालेला वाद यांच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावत’ गेल्या महिनाभरापासून चांगलाच चर्चेत राहिला आहे. या सर्वांमध्ये कमाईत चित्रपटाची सरशी झाली असून येत्या काळात आणखी कोणते विक्रम मोडीत काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.