संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ पाकिस्तानमध्ये कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित होणार आहे. पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणित केले आहे. ‘कोणत्याही कटशिवाय ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास योग्य आहे,’ अशी माहिती पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी आएएनएसला IANS दिली. भारतात वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये ‘यू’ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील काही वितरकांच्या माहितीनुसार चित्रपटात दाखवलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या नकारात्मक भूमिकेला काहींचा विरोध होता. पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य मोबाशिर हसन यासंदर्भात म्हणाले की, ‘कला आणि सर्जनशीलतेशी सेन्सॉर बोर्ड पक्षपात करत नाही.’ चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने इस्लामाबादच्या कैद- ए- आझम विद्यापीठातील इतिहास विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक वकार अली शाह यांचेही सहकार्य घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यता तिथले मुख्य चित्रपट वितरक आणि एव्हररेडी ग्रुपचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी वर्तवली आहे.

वाचा : ‘करणी’ उलटली; ‘पद्मावत’च्या तिकीटांचे दर २४०० रुपयांवर

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गुरुवारी भारतात प्रदर्शित झाला. मात्र, देशातील विविध भागात करणी सेनेकडून या चित्रपटाला तीव्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून चित्रपटगृहांबाहेर पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. करणी सेनेचा विरोध होत असतानाही ‘पद्मावत’ला मात्र प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.