संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावत’ चित्रपटाचा धसका आणखी एका चित्रपटाने घेतला आहे. ‘पॅडमॅन’ आणि ‘अय्यारी’नंतर आता ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीवरून दोन आठवड्यांनी तारीख पुढे ढकलत आता २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवरून याची माहिती दिली.

‘पद्मावत’मुळे बऱ्याच चित्रपटांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. या चित्रपटाविषयीची असलेली चर्चा आणि उत्सुकता लक्षात घेत अक्षय कुमारने त्याच्या ‘पॅडमॅन’चे प्रदर्शन पुढे ढकलले. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाल्यास फटका बसणार हे निश्चित होते, त्यामुळे ९ फेब्रुवारीला ‘पॅडमॅन’ प्रदर्शित करण्याचे ठरवले. त्यानंतर सुरुवातीला २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’ची तारीख पुढे ढकलण्यात आली. ‘अय्यारी’ आणि ‘पॅडमॅन’ हे दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहेत. या सर्व चित्रपटांची स्पर्धा असतानाच अखेर ‘सोनू के टीटू की स्वीटी’च्या निर्मात्यांनाही चित्रपट २३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

‘प्यार का पंचनामा’ सीरिजसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक लव रंजनने ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात कार्तिक आर्यन, नुशरत भारुचा आणि सनी सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.