संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ Padmavati चित्रपट भारतातील सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत निर्मात्यांकडे परत पाठवला. मात्र, ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) दीपिका पदुकोणच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाला अजिबात कात्री न लावता प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला. ब्रिटनमध्ये हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबरला प्रदर्शित होईल. त्यामुळे वादविवांदाच्या कचाट्यात सापडलेल्या ‘पद्मावती’च्या टिमला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वाचा : मालिकेचा काही भाग लीक झाल्यामुळे ​’तुझ्यात जीव रंगला’ची टीम टेन्शनमध्ये

‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप काही राजपूत संघटनांनी केला आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमने सर्व आरोप धुडकावून लावले असून, कोणतेही आक्षेपार्ह दृश्य यात नसल्याचा दावा केलाय. असे असतानाही मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीसुद्धा हा चित्रपट तिथे प्रदर्शित होणार नसल्याची घोषणा काल केली.

Throwback Thursday : कपिल देव यांचे दुर्मिळ फोटो

सेन्सॉर बोर्डाने अद्याप ‘पद्मावती’ बघितला नसल्यामुळे चित्रपटाला प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. दरम्यान, ‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे.