संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमात राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप शमतो न शमतो तोच तंजीम-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम-उल-वजदी यांनी अलाउद्दीन खिल्जीची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. नदीम-उल-वजदी म्हणाले की, ‘सिनेमात खिल्जीला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मुस्लिमांनी याचा विरोध करावा. पद्मावती ही व्यक्तिरेखा सुल्तान खिल्जी यांच्या मुत्यूच्या २५० वर्षानंतरची आहे. त्यामुळे राजपुतांनी नाही तर मुस्लिमांनी या सिनेमाला विरोध करायला हवा.’
सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. इतिहासातील सत्य घटनांची छेडछाड केल्यामुळे करणी सेना आणि इतर राजपूत संघटनांनी संजय लीला भन्साळी यांचा तीव्र विरोध केला आहे. सिनेमाच्या घूमर गाण्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्या काळात राणी किंवा राजघराण्यातील महिला आपले शरीर दाखवत नसत.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना आज संसदेतील माहिती आणि तंत्रज्ञान समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. इथे दोघंही आपापली मतं मांडणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही पद्मावती सिनेमाचा विरोध कमी होत नाही. विश्व हिंदू परिषदचे नेते प्रविण तोगडिया यांनी धमकी देत म्हटले की, ‘जर केंद्र सरकारने या सिनेमावर बंदी घातली नाही, तर चित्रपटगृहात असं काही होईल जे इतिहासात नमूद केले जाईल.’
दरम्यान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये दीपिका आणि शाहिद यांच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, यात या दोघांमध्ये काही जबरदस्त आणि रोमॅण्टिक संवाद दाखवले जाणार असल्याचेही म्हटले जातेय. या ट्रेलरनंतर लोकांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मात्र, अद्याप ट्रेलरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.