सध्याच्या घडीला प्रत्येक कलाकार ते साकारत असलेल्या भूमिकेत जीवंतपणा आणण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणताना दिसतात. शरीरयष्टीपासून ते जगण्याच्या पद्धतीचा या बदलांमध्ये समावेश असतो. दीपिकानेही तिच्या आगामी चित्रपटासाठी बरेच कष्ट केल्याचे दिसते. आगामी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घुमर’ हे पहिलेच गाणे काल प्रदर्शित करण्यात आले. आधी चित्रपटाचा ट्रेलर आणि आता या गाण्याने बॉलिवूड दीवा दीपिका पदुकोणने सर्वांचे मन जिंकलेय. गाण्यातील भरजरी पोशाख आणि दागिन्यांनी नटलेल्या दीपिकावरुन नजर हटवणे कठीणच आहे. पण घुमर नृत्य करताना दीपिकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

वाचा : ‘चला हवा येऊ द्या’चे हास्यतरंग लंडनपर्यंत पोहोचणार!

भरजरी लेहंगा आणि वजनदार दागिने घालून नृत्य करणे दीपिकासाठी किती कठीण होते हे घुमर गाणं पाहताना कळून येते. घुमर एक्सपर्ट ज्योती डी. तोमर यांनी शिकवल्याप्रमाणे तिने नृत्यात काहीच कसर बाकी ठेवलेली नसली तरी हा नृत्यप्रकार करणे तिच्यासाठी सोप नव्हते. या गाण्यात ती एकूण ६६ वेळा स्वतःभोवती फिरताना दिसते. घुमर हा एक राजस्थानी नृत्यप्रकार आहे. राजस्थानी महिला आनंदाच्या प्रसंगी हा नृत्यप्रकार करतात. राजपूतांमध्ये नववधू सासरी प्रवेश करतानाच्या समारंभात हा घुमर नृत्य करतात.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली की, संजय सरांनी दिलेले हे आजवरचे सर्वात कठीण गाणे होते. विशेष म्हणजे चित्रीकरणाची सुरुवातच या गाण्याने झाली त्यामुळे मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. जणू पद्मावतीची आत्माच माझ्यात संचारल्यासारखे वाटत होते.

वाचा : ढिंच्याक पूजावर आमिरची धक्कादायक प्रतिक्रिया!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित दीपिका, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.