बरोबर १ वाजून ०३ मिनिटांच्या मुहूर्तावर बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. ऐतिहासिक कथानकाबरोबरच भव्य सेट, भरजरी कपडे, दागिने, मोठी कलाकार मंडळी ही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये ‘पद्मावती’च्या ट्रेलरमध्येही पाहायला मिळतात. नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भन्साळी यांच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
वाचा : VIDEO ‘करवा चौथ’साठी श्रीदेवी, शिल्पा, सुनीता कपूर, रवीना आल्या एकत्र
तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अवघे दोनच संवाद असून, भन्साळी यांनी संपूर्ण लक्ष पार्श्वसंगीतावर केंद्रीत केल्याचे दिसते. केवळ नजरेतून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणारे राजा रावल रतन सिंह आणि राणी पद्मावती यांच्यासोबतच आपल्या डोळ्यांतून आग ओकणारा अल्लाउद्दीन खिल्जी यांची पुरेपूर झलक यात पाहावयास मिळते. रणवीरला या ट्रेलरमध्ये एकही संवाद देण्यात आला नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरील भाव आपले लक्ष वेधण्यात १०० टक्के यशस्वी होतात.
सकाळीच ‘पद्मावती’च्या टीमने १ वाजून ०३ मिनिटांनी ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, ट्रेलरच्या लाँचसाठी हीच वेळ का निवडण्यात आली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी ही वेळ निवडण्यामागेही एक विशेष कारण आहे. ते म्हणजे, दुपारी ०१.०३ मिनिटे ही वेळ जर आपण २४ तासांच्या स्वरूपात बदलली तर त्याचे उत्तर १३.०३ असे मिळेल. इ.स. १३०३ मध्येच महाराजा रावल रतन सिंह आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यामध्ये युद्ध झाले होते. भन्साळींच्या नजरेने हीच गोष्ट हेरली.
वाचा : बिग बी यंदा वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाहीत!
‘पद्मावती’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या तिनही कलाकारांचे पोस्टर्ससुद्धा विशेष दिवस बघून प्रदर्शित करण्यात आले होते. दीपिकाचा राणी पद्मावती लूक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तर पंचमीला शाहिदचा महारावल रतन सिंहच्या भूमिकेतील लूक प्रदर्शित करण्यात आला होता.