संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या ट्रेलरने फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर बॉलिवूडकरांनाही भुरळ घातली आहे. सोशल मीडियावरही ‘पद्मावती’चीच जादू पाहायला मिळत होती. #पद्मावतीट्रेलर ‘#PadmavatiTrailer’ हा हॅशटॅग सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये होता. करण जोहर, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन, आलिया भट्ट, वरूण धवन यांनीही ट्विटरवरून चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकांचा वर्षाव केला.

चित्रपटाच्या ऐतिहासिक कथानकाबरोबरच भव्य सेट, भरजरी कपडे, दागिने या सर्व गोष्टींबरोबरच दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या अभिनयाचीही स्तुती झाली. ‘ट्रेलर पाहिल्यानंतर या तिघांनीही त्यांच्या करिअरमधील सर्वांत चांगली कामगिरी केली असावी हे दिसून येतंय,’ असं ट्विट करण जोहरने केलं.

‘पद्मावती’च्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अवघे दोनच संवाद असून, भन्साळी यांनी संपूर्ण लक्ष पार्श्वसंगीतावर केंद्रीत केल्याचे दिसते. राणी पद्मावती आणि राजा रावल रतन सिंहसोबतच आपल्या डोळ्यांतून आग ओकणाऱ्या अल्लाउद्दीन खिल्जीची पुरेपूर झलक यात पाहावयास मिळते. रणवीरला या ट्रेलरमध्ये एकही संवाद देण्यात आला नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरील भाव अंगावर काटा आणणारे ठरतात.
ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांनाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. यामध्ये अदिती राव हैदरी आणि जिम सर्भ यांच्याही भूमिका आहेत. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader