दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट नेहमीच चर्चेत असल्याचे दिसतेय. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. रणवीर यात अल्लाउद्दीन खिलजी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या व्यक्तिरेखेशी समरूप होण्याकरिता बॉलिवूडचा ‘अतरंगी अभिनेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीरने स्वतःमध्ये बरेच बदल केले आहेत.

वाचा : जाणून घ्या, अजयच्या ‘बादशाहो’ची पहिल्या दिवसाची कमाई

ऐतिहासिक पात्र साकारण्याकरिता रणवीर खूप मेहनत घेतोय. त्याच्या या मेहनतीचे फळ म्हणून की काय, पण त्याला अभिनेता रजा मुराद यांनी चक्क २४ वेळा कानशिलात लगावली. झालं असं की, रझा मुराद आणि रणवीर एका दृश्याचे चित्रीकरण करत होते. ज्यात रझा मुराद त्याच्या कानशिलात लगावणार होते. पण, परफेक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या भन्साळींना हवे तसे दृश्य मिळत नसल्यामुळे रझा मुराद यांना २४ वेळा रणवीरच्या कानशिलात मारावी लागली. त्यानंतर दिग्दर्शकाला योग्य दृश्य चित्रीत करता आले.

एका हिंदी वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिलेले. त्याचे कात्रण रणवीरने सोशल मीडियावर शेअर करून या वृत्ताला दुजोरा दिला. चित्रपटातील भूमिकेविषयी रणवीर एकदा म्हणालेला की, ‘त्याने (अल्लाउद्दीन खिलजी) जे काही केले त्यावर विश्वास बसत नाही. तुम्ही त्याला माणूसही म्हणू शकत नाही, तो राक्षस होता. त्याचा तिरस्कार करण्यातही तुम्हाला आनंद मिळेल.’

वाचा : बिग बॉसच्या घरात ती करणार ‘पहरेदारी’!

‘पद्मावती’ चित्रपटामध्ये दीपिका ‘राणी पद्मावती’ची तर शाहिद ‘राजा रावल सिंग’ च्या भूमिकेत दिसेल. संजय लीला भन्साळी, दीपिका आणि रणवीर हे त्रिकूट तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी त्यांनी ‘राम लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.