इरफान खानच्या ‘हिंदी मीडियम’ सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सबा ढसाढसा रडत पाकिस्तानी असल्याचं दुःख सांगताना दिसते. सबा कमर हे पाकिस्तानी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव. सबाचं नाव पाकिस्तानमधील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून घेतले जाते. सबाने टीव्ही मालिकांपासून करिअरला सुरूवात केली. हळूहळू तिने पाकिस्तानी सिनेसृष्टीत आपला जम बसवला. तिची पाकिस्तानमधील लोकप्रियता पाहूनच तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पाकिस्तानमधील एका वाहिनीला मुलाखत देत असताना सबा एकाएकी ढसाढसा रडू लागली. पाकिस्तानी असणं म्हणजे काय याचा जगभरात येणारा अनुभव तिने कथन केला.
तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडिओमध्ये सबा म्हणते की, ‘पाकिस्तान ही एक पवित्र भूमी आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे आम्ही दोते. पण जेव्हा आम्ही परदेशात जातो आणि ज्याप्रकारे आमची तपासणी केली जाते ते मी शब्दात मांडू शकत नाही. मला फार लाज वाटते की, एक एक करून आमचे कपडे उतरवले जातात.’ सबाने मुलाखतीत सांगितले की, ‘मला आठवतं की सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भारतीयांसोबत मी परदेशात गेले होते तेव्हा भारतीयांना विमानतळावर फार प्रश्न विचारले नाहीत. त्यांना सहज पुढे जाऊ दिले, मला मात्र अडवण्यात आले. मला रोखण्याचं एकमेव कारणं मी पाकिस्तानी होते हेच होते. त्या दिवशी मला बाहेरच्या देशांमध्ये माझ्या देशाची काय प्रतिमा आहे ते समजले.’
https://twitter.com/AlamSabah/status/953142726966501376
सबाचा हा व्हिडिओ शेअर करत काही पाकिस्तानी लोकांनी म्हटले की, ‘फक्त सबाच नाही तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला हे सहन करावं लागतंय. आमच्या मुलांना किड्या- मुंग्यांप्रमाणे मारले जाते. पण हाफिज सईदसारखा दहशतवादी मात्र उघडपणे फिरत आहे.’