भारतीय हवाई दलाचे एएन- ३२ हे विमान सोमवारी दुपारी एक वाजता बेपत्ता झाले. या विमानात एकूण १३ जण होते. वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने यावरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

मोदींना टॅग करत तिने ट्विट केले की, ‘भारतीय हवाई दलाचे एएन- ३२ हे विमान क्रॅश झाले नाही. ढगाळ वातावरणामुळे रडार शोधू शकत नाहीये- लष्करी वैज्ञानिक पीएम श्री नरेंद्र मोदी.’ वीणाच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही वीणाने सोशल मीडियावर मुक्ताफळं उधळली होती. त्यावेळी स्वरा भास्करसह इतर बॉलिवूड कलाकारांनीही तिच्यावर टीका केली होती.

सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून एएन -32 हे विमान बेपत्ता झाले होते, त्यानंतर तपासपथकांनी शोधकार्य सुरू केले. या विमानात आठ 8 कर्मचारी आणि 5 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत.