रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ते दोघेही न्यूयॉर्कच्या रस्त्यावर कोणाचीही तमा न बाळगता धुम्रपान करताना दिसले होते. रणबीर आणि माहिराचे हे फोटो पाहून अनेकांनीच त्याविषयी विविध तर्क लावण्यास सुरुवात केली. किंबहुना या फोटोंमुळे दोन्ही कलाकारांवर टीकेची झोडही उठवण्यात आली होती. त्यात माहिरावर टीका करणाऱ्यांची संख्या जास्त होती.

माहिराने धुम्रपान केल्यामुळे आणि तोकडे कपडे घातल्यामुळे तिला अनेकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी बऱ्याच कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. खुद्द रणबीरही तिच्या बचावासाठी धावला होता. पण, या साऱ्यावर माहिराने मात्र बरेच दिवस मौन बाळगले आणि शेवटी तिने या सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. एका कार्यक्रमाला पोहोचलेल्या माहिराने ती गोष्ट खासगी असल्याचे म्हणत त्यावर फार काही बोलण्यास नकार दिला होता.

माहिराने याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया देऊनही त्या फोटोविषयीच्या चर्चा काही केल्या थांबण्याचे नावच घेत नव्हत्या. त्यातच आता पुन्हा एकदा माहिराच्या अनपेक्षित वक्तव्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘त्या विषयी मी कोणतीही प्रतिक्रिया न देणे फारच चुकीचे ठरेल. मी फारच धीट महिला आहे. पण, या सर्व गोष्टी घडल्या त्यावेळी मात्र मी पूर्णपणे खचले होते. या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे मला दररोज वाटत होते. पण, कसेबसे मी स्वत:ला रोखले होते. कारण मीसुद्धा एक माणूस आहे, त्यामुळे माझ्याकडूनही चुका होऊ शकतात’, असे माहिरा म्हणाली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘माझी आजी किंवा मामा ते फोटो पाहून ज्या प्रकारे व्यक्त झाले असते, नाराज झाले असते अगदी त्याच प्रकारे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आताही माझ्याहून कोणी मोठी व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी त्या फोटोंविषयी नाराजी व्यक्त केली तर मी लगेचच त्यांची माफी मागते’, असेही तिने स्पष्ट केले. माहिरा नेहमीच काही महत्त्वाच्या विषयांवर तिची मतं ठामपणे मांडत असते. आपण कोणी आदर्श व्यक्तिमत्त्वं नसून, फक्त एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत, असेही तिने सांगितले. त्यामुळे रणबीर सोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंविषयी माहिराने दिलेली ही प्रतिक्रिया पाहता निदान आतातरी तिच्याविषयीच्या चर्चा थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader