स्वाती वेमूल

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच विषय अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी केला आहे. ‘मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं या युद्धाचं वर्णन केलं जातं. हे युद्ध तितक्याच तिव्रतेने मोठ्या पडद्यावर दाखवणं आणि त्याच्या सर्व बाजू मांडण्याचं आव्हान गोवारीकरांसमोर होतं. सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाईंच्या नजरेतून हा ‘पानिपत’ त्यांनी प्रेक्षकांसमोर आणला.

मराठ्यांनी उदगीरचा किल्ला काबिज करण्यापासून या चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते. सदाशिवराव भाऊ (अर्जुन कपूर) हा किल्ला जिंकून इब्राहिम खान गारदीला पेशव्यांच्या सैन्यात समाविष्ट करून घेतात. मध्यांतरापूर्वी मराठ्यांचं साम्राज्य, सदाशिवराव भाऊ व पार्वतीबाई (क्रिती सनॉन) यांची झालेली ओळख, त्यांचा विवाह, मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीब-उद-दौलाकडून झालेली क्रूर हत्या, मराठ्यांना पराजित करण्यासाठी नजीबने कंदहारच्या अहमद शाह अब्दालीला (संजय दत्त) भारतात बोलावणं, या सर्व घटना घडतात. तर मध्यांतरानंतरच्या भागात मराठ्यांनी युद्धाची तयारी कशी केली, त्यात पार्वतीबाईंची काय भूमिका होती, मराठ्यांनी लाल किल्ला कसा जिंकला, त्यानंतर पानिपतचा मुख्य लढा असे सर्व दाखवण्यात आले.

आठ वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने सहा फ्लॉप चित्रपट दिले. त्यामुळे ‘पानिपत’चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयाबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. सदाशिवराव भाऊंची प्रतिमा अर्जुन मोठ्या पडद्यावर तितक्याच ताकदीने उभा करू शकेल का अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. पण चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतर गोवारीकरांनी निवडलेल्या अभिनेत्याने त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याची भावना मनात येते. अर्थात याचं ७० टक्के श्रेय हे गोवारीकरांनाच जातं. त्यानंतर अभिनेत्री क्रिती सनॉन हिची तुलना ‘बाजीराव मस्तानी’मधल्या काशीबाई यांच्या भूमिकेशी झाली. मात्र क्रितीनेही कुठल्याही बाबतीत कॉपी न करता पार्वतीबाईंच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तिचाही हा प्रयत्न यशस्वी होतो. तसं पाहिलं तर ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची दोघांची ही पहिलीच वेळ. तरीही पहिल्या प्रयत्नात दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेसाठी संजय दत्त ही गोवारीकरांची निवड अत्यंत योग्य ठरते. कॅमेरावर ‘लार्जर दॅन लाइफ’ वाटणाऱ्या संजय दत्तने दाद द्यावा असा अभिनय केला आहे. तर इब्राहिम खान गारदीच्या भूमिकेसाठी नवाबशिवाय दुसरा कुठलाच अभिनेता योग्य वाटला नसता ही भावना चित्रपट पाहताना सारखी मनात येते.

‘पानिपत’ म्हटल्यावर मुख्य युद्ध कशाप्रकारे मोठ्या पडद्यावर दाखवणार हे मोठं कौशल्याचंच काम आहे. वीस मिनिटांहून अधिक वेळ या युद्धासाठी चित्रपटात दिला आणि या वेळेतला प्रत्येक सेकंद अत्यंत विचारपूर्वक मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. यासाठी गोवारीकरांच्या दिग्दर्शनाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. या श्रेयाचा मोठा वाटा संगीत दिग्दर्शकांसाठीही जातो. चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोर असो, गाणी असो किंवा मग युद्धादरम्यान दिलेलं पार्श्वसंगीत असो, अजय-अतुल या जोडगोळीने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. शत्रूची वाढती शक्ती पाहून आपल्या सैन्याला साथ देण्यासाठी सदाशिवराव भाऊ जेव्हा हत्तीवरून खाली उतरून लढू लागतात तेव्हाची पाच मिनिटं अक्षरश: अंगावर शहारे आणतात. चित्रपटात वीएफएक्सचाही उत्तम वापर करण्यात आला आहे. युद्धातील व्यूहरचना, मराठ्यांनी केलेला संकटांचा सामना, पार्वतीबाईंचं योगदान अशा गोष्टी अत्यंत बारकाईने गोवारीकरांनी मांडली आहे.

‘पानिपत’ या युद्धाचा शेवट जरी सर्वांना माहित असला तरी चित्रपटाचा शेवट हा ‘पानिपत’ या शब्दाचा अर्थ बदलण्यास भाग पडतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

‘लोकसत्ता ऑनलाइन’कडून चित्रपटाला चार स्टार्स