अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, आतापर्यंत किती आणि कोणाचे जबाब नोंदवले गेले, यांसारख्या मुद्द्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितलेले दहा महत्त्वाचे मुद्दे..

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.

२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.

३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.

४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.

५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.

६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.

७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.

८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.

९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.

१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.