गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनय कौशल्याने अभिनेते परेश रावल यांनी बरेच चित्रपट गाजवले. आगामी संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये ते सुनील दत्त यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय आणखी एक आव्हानात्मक भूमिका ते भविष्यात साकारणार आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका.
गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीची चर्चा ऐकायला मिळत होती. अखेर त्यावर परेश रावल यांनी शिक्कामोर्तब केला आहे. पुढील काही महिन्यांत त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असून परेश रावल यामध्ये मोदींची भूमिका साकारणार आहेत.
वाचा : फुटबॉल सामनादरम्यान रणबीर कपूरला दुखापत
‘चित्रपटाच्या कथानकावर सध्या काम सुरू असून पुढील काही दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत,’ अशी माहिती त्यांनी दिली. परेश रावल हे स्वत: भाजपा खासदार असून मोदींची भूमिका साकारणं काही सोपं नाही असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. ‘ही सर्वात अवघड आणि आव्हानात्मक भूमिका आहे,’ असं ते म्हणाले.
१९९४ मध्ये त्यांनी ‘सरदार’ या बायोपिकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आता मोदींच्या लूकमध्ये परेश रावल यांना पाहण्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रावल हे स्वत: चित्रपटाची निर्मितीसुद्धा करत आहेत.