जगप्रसिद्ध सेलिब्रिटी पॅरिस हिल्टनने एका क्लबमध्ये डान्स करताना तिची २० लाख डॉलर म्हणजे साधारणतः १३ कोटींची साखरपुड्याची अंगठी हरवली. अंगठी हरवल्यानंतर तिच्या प्रियकराने ती अंगठी शोधूनही दिली. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पॅरिस म्हणाली की, ती क्लबमध्ये बेभान होऊन नाचत होती त्यात तिची मोठी अंगठी हातातून पडली. साखरपुड्याची अंगठी हरवल्याने ती फार घाबरली. क्लब पूर्ण भरलेला होता आणि काळोखही होता. ती अंगठी कुठे पडली असेल याची काहीच कल्पना तिला नव्हती. तिच्या प्रियकराने क्लबच्या व्हीआयपी भागात अंगठी शोधली तेव्हा त्याला एका बर्फाच्या बकेटमध्ये ती पडलेली मिळाली.

अंगठी शोधताना हिल्टन प्रचंड रडत होती. हिल्टनने आयुष्यातील सर्वात घाबरवायला लावणाऱ्या प्रसंगापैकी हा एक प्रसंग असल्याचे ती म्हणाली. ती म्हणाली की, अंगठी फार जड आणि मोठी होती. पण जेव्हा मी डान्स करत होते तेव्हा ती माझ्या बोटातून निसटून बर्फाच्या बकेटमध्ये पडली. देवाच्या कृपेने दुसऱ्यांना ती अंगठी मिळण्याआधी माझ्या प्रियकराला ती मिळाली.

व्यावसायिक आणि टीव्ही पर्सनॅलिटी असलेली पॅरिस ही हॉलिवूडची नावाजलेली सेलिब्रिटी आहे. हिल्टनने तिच्याहून चार वर्ष लहान असलेल्या प्रियकराशी क्रिस जिल्काशी साखरपुडा केला होता. क्रिस स्वतः अभिनेता आणि मॉडेल आहे. स्वतः पॅरिसने याबद्दल तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली होती. ट्विटरवर क्रिससोबतचा फोटो टाकत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी फार आनंदी आहे की माझ्या मित्रासोबत आणि माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत साखरपुडा करत आहे. माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट, प्रामाणिक, दयाळू आहे तो. मला जगातील सर्वात आनंदी मुलगी असल्याचा भास होत आहे. तू माझं स्वप्न पूर्ण केलंस.