२५ जानेवारीपासून रात्री ८ वा. झी मराठीवर
चांगल्या गोष्टींचा शुभारंभ करण्यासाठी चांगला मुहूर्त बघण्याची आवश्यकता असते असं मानणारा आपल्याकडचा एक वर्ग. तर ज्या वेळी चांगल्या गोष्टींचा विचार डोक्यात येतो तेव्हाच कामाला सुरूवात करणे हाच खरा मुहूर्त असं मानणारा एक दुसरा वर्ग. या दोन वर्गाची ही परस्परभिन्न मते आणि त्यावरून होणारे वाद विवाद आपण नेहमीच अनुभवतो आणि या वादाची प्रचिती येते ती विवाहाच्या प्रसंगी. लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात पण खाली त्या गाठी जुळवण्यासाठी अनेकजण आधार घेतात ते जन्मपत्रिकेचा आणि पंचागांचा. मुला मुलीच्या राशींपासून ते त्यांच्या कुंडलीत असणा-या ग्रहांची आणि गुणांची तपासणी करूनच लग्नाची ही बोलणी पुढे सरकते. परंतु ज्यांचं लग्न होणार आहे त्या दोघांची मने जुळलेली असतील तर मग पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का ? पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का ? या प्रश्नांवरच आधारित एक नवी मालिका ‘पसंत आहे मुलगी’ झी मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या २५ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा. ही मालिका प्रसारित होणार आहे.
‘पसंत आहे मुलगी’ची कथा आहे उर्मी आणि पुनर्वसू उर्फ वासूची. कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकणारे हे दोघे जण परस्पर भिन्न स्वभावाचे. चांगल्या कामासाठी मार्गही चांगलाच हवा असं मानणारी उर्मी तर काम जर चांगलंच असेल तर मग चुकीचा मार्गही अवलंबला तर काय हरकत आहे असं मानणारा वासू. उर्मीच्या घरात पुरोगामी विचाराचं वातावरण. तर वासू पंत कुटुंबातला. त्याचे वडिल गावचे मठाधिपती. पंचक्रोशीत या पंतांना मोठा मान. त्यांचा शब्द म्हणजे आदेश आणि तोच अंतिम निर्णय असे मानणारे त्यांचे अनेक अनुयायी. अशा वातावरणात वाढलेला वासू हा खरं तर दुहेरी आयुष्य जगतोय. गावात त्याची असलेली पुनर्वसू पंत अशी ओळख तो शहरात लपवतो. आपल्या रोखठोक स्वभावामुळे कॉलेजमध्ये लोकप्रिय असलेली उर्मी वासूला मनापासून आवडत असते परंतु आपल्या मनातील भावना तो कधी व्यक्त करत नाही. कॉलेजमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्याद्वारे त्या दोघांमध्ये मैत्री होते आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. याचदरम्यान वासू उर्मीला लग्नाची मागणी घालतो. उर्मीलाही वासूमध्ये आपला भावी जोडीदार दिसतो त्यामुळे तीही यासाठी तयार होते. परंतू इथूनच वासूची खरी परीक्षा सुरू होते. कारण त्याच्या घरात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पत्रिका आणि पंचांगाचा आधार घेतला जातो तर दुसरीकडे उर्मीच्या आई वडिलांनी तिची जन्मपत्रिकाही तयार केलेली नाहीये. वासूपुढे याचमुळे खरा पेचप्रसंग उभा राहतो. कारण हे लग्न जुळवण्यासाठी उर्मीची जन्मपत्रिका ही मुख्य गरज कारण ती टाळून वासू वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. अशा वेळी वासू काय करणार ? हे लग्न जुळवण्यासाठी तो उर्मीसमोर खरी गोष्ट मांडणार की घरातल्या लोकांसमोर एखाद्या खोट्या गोष्टीचा आधार घेणार ? उर्मी या सर्वासाठी तयार होईल का मने जुळलेली असताना पत्रिका जुळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं का या सर्वांची उत्तरे म्हणजे ही मालिका.
‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेतून उर्मी आणि वासूच्या भूमिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वासूच्या वडिलांच्या म्हणजेच पंतांच्या दमदार भूमिकेत डॉ. गिरीश ओक बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत मेघना वैद्य, पद्मनाभ बिंड, केतकी सराफ, नम्रता कदम, रमा जोशी, विजय मिश्रा, सिद्धीरूपा करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेची संकल्पना समीर विद्वांस यांची असून पटकथा शार्दूल सराफ यांची आहे तर दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे. येत्या २५ जानेवारीपासून रात्री ८.०० वा. ही मालिका झी मराठीच्या ताफ्यात दाखल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा