बॉलिवूडमधील नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान याने नुकतेच एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘द इंडियन एक्प्रेस’च्या या कार्यक्रमामध्ये सैफने विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देत त्याचे विचार उपस्थितांसमोर मांडले. यावेळी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सैफने बरीच चर्चा केली. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन हल्ली लोकं प्रमाणाबाहेर बोलून टोकाची भूमिका घेताना दिसताहेत, असे मत सैफने यावेळी मांडले.

विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या प्रश्नांवर सैफने विचारपूर्वक उत्तरं दिली. भारतीयांच्या बदलत्या विचारसरणीविषयी प्रश्न विचारला असता सैफ म्हणाला, ‘परिस्थिती बदलते आहे. हळूहळू सर्वांचीच विचार करण्याची पद्धतही बदलते आहे. पण, हा बदल फक्त भारतातच आढळतो असे नाही. संपूर्ण जगाचीच विचारसरणी बदलत चालली आहे.’ याच वक्तव्याला आधार देत सैफने पॅरिस दौऱ्यात त्याला आलेल्या अनुभवाविषयी सांगितले. हा अनुभव सांगताना सैफ म्हणाला, ‘एका इटालियन चित्रपट दिग्दर्शकासोबत जेवणासाठी बाहेर गेल्यावर गप्पांच्या ओघात त्याने मला विचारले, ‘तर… तुम्ही मुस्लिम आहात?’ मी त्यावर ‘हो’ म्हणालो. त्यावर तो म्हणाला ‘तुम्ही मुस्लिम असल्याचे कोणाला सांगू नका..’ त्याचे हे वक्तव्य ऐकून मी काहीसा हसलो कारण हे सर्व सरावाचं झालं होतं. या अनुभवाविषयी सांगताना सैफने हा सर्व प्रकार भारतात तुलनेने कमी पाहायला मिळतो असेही स्पष्ट केले.

असहिष्णुता आणि राष्ट्रवाद याविषयी मत मांडताना सैफ म्हणाला, ‘अनेकदा आपल्या आजूबाजूला जे काही सुरु असते त्याला विरोध म्हणून अनेकजण एकत्र येतात आणि त्याला राष्ट्रवादाचं नाव देतात. पण, आपण कोणत्या गोष्टीसाठी एकत्र येत आहोत याचा विचार करणंही तितकच गरजेचं आहे. पाश्चात्य देशांमध्ये हिंसा आणि असहिष्णुतेचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत आपल्याकडे हे प्रमाण कमी असल्यामुळे ही सकारात्मक बाब आहे याकडेही लक्ष दिले पाहिजे.’ एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमामध्ये सैफने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत त्याची भूमिका स्पष्ट केली.