बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा आगामी चित्रपट ‘झिरो’च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली असून प्रदर्शनाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या चित्रपटातील टीझरमध्ये शाहरुखच्या हातात कृपाण दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाच्या भावाना दुखवाल्या गेल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

शाहरुखने कृपाण धारण केल्याचं दृश्य वगळल्याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी ‘झिरो’ हा चित्रपट कोणत्याही अडथळ्यांविना प्रदर्शित होऊ शकतो. ‘शाहरुख आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुद्दामहून चित्रपटात कृपाणचं दृश्य दाखवलं आहे. केवळ प्रसिद्धीसाठी याचा वापर करण्यात आला आहे. मात्र प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात विशिष्ठ समाजाच्या भावना आपण दुखावल्या आहेत याचं भान दोघांना नाही. त्यामुळे चित्रपटातून हे दृश्य वगळावं,’ अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

‘झिरो’ या चित्रपटात शाहरुखसोबतच अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. शारीरिक व्यंगाकडे दुर्लक्ष करत आयुष्य एका वेगळ्या प्रकारे जगायला शिकवणारा हा चित्रपट असणार आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तींची भूमिका साकारत आहे. आनंद राय दिग्दर्शित ‘झीरो’ या चित्रपटात झीरोचा हिरोपर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे.