‘मुझको भी तो लिफ्ट करा दे’ या गाण्याने प्रसिद्धीस आलेला गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया सामी यांना ८ मे २०१७ रोजी कन्यारत्न झाले. अदनानने ट्विटरच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. ‘मला आणि रोयाला मुलगी झाली आहे. आम्ही तिचे नाव मदिना सामी खान असे ठेवलेय. माझा आनंद गगनात मावत नाहीये.’, असे तो म्हणाला होता.
बॉलिवूडमध्ये सुरूवातीच्या काळात अदनान सामी गाण्यासोबत त्याच्या दिसण्यासाठीही प्रसिद्ध होता. या काळात त्याचे वजन अनेकांच्या थट्टेचा विषय होते. त्यानंतर काही काळ अदनान लोकांच्या विस्मृतीत गेला होता. परंतु, आपले वजन कमालीचे घटवून नव्या रूपात जगासमोर आल्यानंतर अदनान पुन्हा चर्चेचा विषय बनला. ‘फॅट टू फिट’ असा प्रवास करणाऱ्या या गायकाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी रोया आणि लाडकी लेक मदिनादेखील होती. जवळपास ४० मिनिटे अदनान याने पंतप्रधानांशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्याचा आनंद व्यक्त करत अदनानने लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रेमाने आणि आपुलकीने आमचे स्वागत केले ते खरंच खूप सुंदर होते. त्यांनी मदिनाला आशीर्वाद देतानाचा क्षण आमच्यासाठी भावूक करणारा होता.’
अदनानने २०१५ साली भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर संमती दर्शविली आणि तो १ जानेवारी २०१६ पासून भारतीय नागरिक झाला. दरम्यान, अदानानच्या मुलीचा जन्म जर्मनी येथे झाला असून, तिला जन्मापासून जर्मन नागरिकत्व मिळालेय.
https://www.instagram.com/p/BY0yr1clFiO/