एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजेच मनिषा कोईराला. ९०च्या दशकात मनिषाच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर पाहायला मिळाली. पण, काही काळानंतर ही अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दुरावली. कॅन्सरचे निदान झाल्याने मनिषासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. आता ती या आजारातून पूर्ण बरी झाली असून, पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
वाचा : मी क्रिकेटपटू किंवा श्रीमंत व्यवसायिकाशी लग्न करणार नाही- तापसी पन्नू
रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत असलेला संजय दत्तचा बायोपिक यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीरचा लूक आणि यातील कलाकार वगळता अद्याप चित्रपटाबद्दल कोणतीच माहिती समोर आणण्यात आलेली नाही. अगदी चित्रपटाचे शीर्षकही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण, नुकतेच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या मनिषा कोईरालाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटात संजूबाबाच्या आई आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या भूमिकेतील मनिषाचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या ४७ वर्षीय अभिनेत्रीसोबत रणबीर, दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि चित्रपटातील इतर कलाकार फोटोत दिसतात.
फोटोमध्ये नर्गिस यांच्या व्यक्तिरेखेतील मनिषाचा लूक नक्कीच लक्षवेधी आहे. एकंदरीत ती नर्गिस यांच्या भूमिकेस पुरेपूर न्याय देईल असे म्हणण्यास हरकत नाही. ही भूमिका साकारण्यासाठी मनिषाला मदत व्हावी याकरिता प्रिया दत्त यांनी तिला ‘मि अॅण्ड मिसेस दत्त, मेमरीज ऑफ अवर पॅरेन्ट्स’ हे नम्रता दत्त कुमार यांनी लिहिलेलं पुस्तक भेट स्वरुपात दिले होते. एका मुलाखतीत नर्गिस यांच्या भूमिकेविषयी मनिषा म्हणालेली की, आम्ही अनेक लूक टेस्ट केल्या. यात मी त्यांच्याप्रमाणे (नर्गिस) केसांच्या स्टाइलमध्ये बरेच बदल करून पाहिले. अखेर, त्यांच्या लूकच्या जवळपास असा लूक मला मिळाला याचा मला आनंद आहे. त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
TOP 10 NEWS वाचा : रणबीर-माहिराच्या ब्रेकअपपासून प्रतिक बब्बरच्या साखरपुड्यापर्यंत..
मनिषा आणि रणबीर व्यतिरीक्त चित्रपटात परेश रावल हे सुनिल दत्त तर संजूबाबाची पत्नी मान्यताच्या भूमिकेत दिया मिर्झा दिसेल. तसेच, अनुष्का शर्मा, विकी कौशल आणि सोनम कपूर हेसुद्धा चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातील उतारचढाव दाखविणारा हा चित्रपट यावर्षात प्रदर्शित होईल.
https://www.instagram.com/p/BdiIFUingOM/