स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवा ही गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच शिकवण्यात येते. घर स्वच्छ ठेवलं जातं मात्र बऱ्याचदा घरातला कचरा रस्त्यावरच फेकला जातो. घरासोबतच परिसराची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे सांगणारा प्रसंग नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये चित्रित करण्यात आला.

शुभम आणि कीर्तीने कठपुतळी बाहुल्यांच्या रुपात स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीत टाकायला हवा याचा धडा सर्वांना अनोख्या पद्धतीने दिला.

आणखी वाचा : आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी

मालिकेतल्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा हर्षद अटकरी म्हणाला, “मराठीत आजवर असा प्रयोग झालेला नाही. पहिल्यांदाच अश्या पद्धतीचा ट्रॅक शूट करण्यात आला आहे. हा सीन शूट करण्यासाठी खास कोरिओग्राफरला बोलावण्यात आलं होतं. या पूर्ण सीनची कोरिओग्राफी करण्यात आली. मी आणि समृद्धीने सराव करुन हा सीन केला. या सीनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं.”