महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहेच. पण त्यासोबतच या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले. या बायोपिकमध्ये बाळासाहेबांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त गोष्टी दाखवल्या जाणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘बाळासाहेबांचं आयुष्य म्हणजे एक खुलं पुस्तक आहे. त्यांनी कधीच कोणापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आम्ही या चित्रपटात असं काहीच दाखवणार नाही आहोत.’
संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर अभिजीत पानसे चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.