एकेकाळची प्रसिद्ध टीव्ही मालिका म्हणून खिचडी या मालिकेकडे पाहिले जायचे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ही मालिका आवर्जुन पाहायचे आणि खळखळून हसायचेही. हंसाचा बालिशपणा असो किंवा प्रफुलचा वेंधळेपणा… प्रत्येकालाच ही आगळी वेगळी जोडी भन्नाट आवडली होती. आता हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे. रविवारी या मालिकेचे मुख्य कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. असे म्हटले जाते की मोदींनाही ही मालिका फार आवडायची. ते वेळात वेळ काढून ही मालिका पाहायचे.

नव्याने सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी मोदी यांनी कलाकारांना भरभरून शुभेच्छा दिल्या. मालिकेचे निर्माते जेडी मजीठीयाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मोदी यांच्यासोबतचे कलाकारांचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी विचारले की यावेळी खिचडी कशी झाली आहे?’

आतापर्यंत जेडी मजीठीयाच्या खिचडी मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हे प्रोमो पाहून सर्वांना आवडणारी जुनी खिचडीच अजून दमदार स्वरुपात पाहायला मिळणार अशीच आशा व्यक्त केली जात आहे. या मालिकेत आधीचीच टीम पाहायला मिळत आहे. मजीठीया, सुप्र‍िया पाठक, अनंग देसाई, राजीव मेहता आणि इतर कलाकार खिचडी मालिकेतून आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत.

मोदी यांना ‘खिचडी’ मालिका आवडते हे जेडी मजीठीयाला आधीपासूनच माहित होते. जेव्हा या मालिकेचा सिनेमा बनवण्यात आला तेव्हा मजीठीयाने तो मोदींनाही दाखवला होता. याबद्दल बोलताना जेडी म्हणाला की, ‘त्यांना सिनेमाही आवडला होता आणि या मालिकेचा दुसरा भाग सुरू करण्याचेही सुचवले होते.’