गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन कलाकारांविषयी बरंच काही म्हटलं जात आहे. काही कलाकारांना उपद्रवी युजर्सचा बराच त्रासही सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि सलमान खान यांना मारण्याची सुपारी देणारा एक व्यक्ती चर्चेत आला होता. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २०१७ च्या निवडणुकांमध्ये अहलाबादमधून भारतीय सामाजिक क्रांती दलाच्या उमेदवार असणाऱ्या अरविंद सिंह चट्टान याने फेसबुक पोस्ट करून सलमान खानला जीवे मारणाऱ्यास ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

अरविंदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘ट्युबलाइट’च्या प्रसिद्धीदरम्यानचा सलनमानचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सलमान भारतीय सैन्याला पाकिस्तानसोबत युद्ध न करता त्यांनी गळाभेट करत वाद मिटवण्याविषयीचं वक्तव्य करताना दिसत होता. या व्हिडिओचा धागा पकडत अरविंद चट्टानने थेट सलमानला मारणाऱ्या व्यक्तीला ५० लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

फक्त सलमान नाही तर, राहुल गांधीवरही अरविंदने निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं होतं. राहुल गांधींना राजकारण जमत नाही, असं म्हणत राहुल गांधीला मारुन मला संपर्क साधा असे या पोस्टमध्ये म्हटले होते. अरविंदच्या या अशा वागण्यामुळे आणि या चिथावणीखोर पोस्टमुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या विक्षिप्तपणे वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो बऱ्याच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांविरोधात कमेंट्स करत आहे. त्याच्या या पोस्टचं गांभीर्य लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या