एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास. आज प्रभासचे जगभरात लाखो चाहते आहेत. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. पण या सुपरस्टारकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण प्रभासच्या वाढदिवशी त्याचा एकूण संपत्ती विषयी जाणून घेणार आहे.

रीपब्लिकने दिलेल्या वृत्तानुसार प्रभासकडे एकूण १२९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स या उच्चभ्रू वस्तीत त्याचा आलिशान बंगला आहे. २०१४ मध्ये त्याने चित्रपट नगरातही आणखी एक बंगला खरेदी केला होता. इतर दाक्षिणात्य सुपरस्टारप्रमाणे प्रभासलाही महागड्या गाड्यांची आवड आहे. तब्बल आठ कोटी रुपये किंमत असलेली रोल्स रॉयल फँटम कार त्याच्याजवळ आहे. अनेकदा तो या कारमधून फिरताना दिसतो. या व्यतिरिक्त त्याच्याकडे BMW, रेंजरोवर अशा अनेक महागड्या गाड्या आहेत.

प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील, सुर्यनारायण राजू चित्रपट निर्माते आहेत. तर काका कृष्णम राजू प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते आहेत. त्याचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आणि हैदराबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी.टेक.ची पदवी घेतली. त्यानंतर प्रभासने इश्वर या तेलुगू चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर जादू केली.