‘बाहुबली २’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासच्या चाहत्यांचे लक्ष आगामी ‘साहो’ चित्रपटाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे हैदराबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले. त्यानंतर दिवाळी आणि प्रभासच्या वाढदिवसासाठी संपूर्ण टीमला काही आठवड्यांची सुट्टी देण्यात आली. त्याच दरम्यान २३ ऑक्टोबरला प्रभासच्या वाढदिवशी ‘साहो’चा फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला. या सर्व घडामोडींनंतर ‘साहो’ची टीम आता पुन्हा एकदा कामाला लागली आहे.
वाचा : लवकरच येतोय ‘साजन चले ससुराल २’
एका आंतरराष्ट्रीय लोकेशनवर चित्रपटाचे पुढचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यावेळी काही अॅक्शन सीन्स चित्रीत करण्याचा निर्णय दिग्दर्शकाने घेतलाय. मात्र, दिग्दर्शक सुजीत सिंगला प्रभासची एक गोष्ट खटकली आहे. अॅक्शन सीनसाठी प्रभासने स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा बॉडी डबलचा वापर करण्यास दिग्दर्शकाने सांगितले होते. पण, या हरहुन्नही अभिनेत्याने बॉडी डबलसाठी नकार दिल्याने सुजीत आता चिंतेत पडला आहे.
चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांच्या माहितीनुसार, ‘साहो’मधील एकाही दृश्यासाठी प्रभासला बॉडी डबलचा वापर करण्याची इच्छा नाही. चित्रपटासाठी काही निष्णात कॉरिओग्राफर्सची निवड करण्यात आल्याने आपण सुरक्षित हातात असल्याची खात्री त्याला आहे. पण, चित्रपटादरम्यान काही ना काही दुखापत करुन घेण्याच्या प्रभासच्या सवयीमुळे सुजीत चिंतेत आहे. बाहुबलीच्या वेळीही त्याने खांद्याला दुखापत करून घेतली होती. त्यानंतर त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे जीवाची बाजी लावणाऱ्या स्टंटसाठी तरी निदान त्याने बॉडी डबलचा वापर करावा, असे दिग्दर्शकाला वाटतेय.
वाचा : असा पार पडला निर्मिती सावंत यांच्या मुलाचा साखरपुडा
दरम्यान, चित्रपटामध्ये पाण्यात खोलवर जाऊन काही दृश्ये चित्रीत करावयाची असल्याचे कळताच प्रभासने लगेच ‘डीप सी डायव्हिंग’चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जेणेकरून, तो सदर दृश्यांना पुरेपूर न्याय देऊ शकेल. प्रभासची कामाप्रती असलेली आत्मीयता पाहता कदाचित सुजीतला माघार घ्यावी लागणार असे दिसते.