सोशल मीडियावर मानहानिकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. या हिंसाचारामध्ये ६० पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. बंगळुरमध्ये घडलेली ही घटना धर्मांधतेचं लक्षण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

अवश्य पाहा – “संपूर्ण देश अडाणी लोकांनी भरलाय का?”; बंगळुरुमधील घटनेवर अभिनेता संतापला

“धर्माच्या नावाखाली त्यांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. हे असभ्य लोकांचं लक्षण आहे. या धर्मांधतेची मी निंदा करतो. ज्या गुंडांमुळे ही दंगल उसळली त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. एक समाज म्हणून आपण अशा घटनांना प्रोत्साहन देणं टाळायला हवं.” अशा आशयाचं ट्विट करुन प्रकाश राज यांनी बंगळुरुमध्ये घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन हा सर्व वाद निर्माण झाला. शहरातील डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या हिंसक चकमकी झाल्या. पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. या हिंसाचारामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह ६० पोलीस जखमी झाले आहेत. बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर मानहानीकारक पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.