पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ‘मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते असून, माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत,’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत:ला फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश?,’ असे प्रकाश राज म्हणाले. बंगळुरू येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (DYFI) बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा देत ते पुढे म्हणाले की, ‘मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. चांगले दिवस परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’
मोदींनी गौरी लंकेश यांच्याप्रकरणी यापुढेही मौन बाळगले तर पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा प्रकाश राज यांनी दिला. गौरी लंकेश यांना प्रकाश राज ३० वर्षांपासून ओळखत होते. गेल्या महिन्यात गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता.