दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला आता अभिनेते प्रकाश राज यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. ‘पद्मावती’, ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या चित्रपटांच्या विरोधात लोकांच्या काही गटाकडून देशात जे वातावरण निर्माण केलं जात आहे, त्यावर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला.
ट्विटरवर त्यांनी लिहिले की, ‘एकाला नाक कापायचे आहे, एकाला कलाकाराचा शिरच्छेद करायचा आहे, एकाला अभिनेत्यावर गोळी झाडायची आहे आणि परीक्षकांच्या मान्यतेनंतरही सरकारी यंत्रणेला चित्रपट महोत्सवातून काही चित्रपटांना काढून टाकायचे आहे. हे सर्व घडत असताना देशात अहिष्णुता नाही, लोकांचा आवाज दाबला जात नाही, त्यांना धमकावले जात नाही असे आम्ही मानायचे का?’
Who’s calling the shots…..#justasking pic.twitter.com/SWjk17bs31
— Prakash Raj (@prakashraaj) November 16, 2017
‘पद्मावती’चा वाद दिवसेंदिवस तीव्र होत असून आता करणी सेनेने दीपिका पदुकोणलाच धमकी दिली. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी म्हटले. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राजपूत संघटनांसाठी सर्वांत आधी स्क्रिनिंग ठेवणार असल्याचं भन्साळींनी मान्य करूनही चित्रपटाला विरोध कायम आहे.
वाचा : ‘दशक्रिया’ न दाखवण्याचा पुण्यातील ‘सिटी प्राइड’चा निर्णय
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून रवी जाधवचा ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट आणि सनल कुमार ससिधरन यांचा ‘एस दुर्गा’ हा मल्याळम चित्रपट परीक्षकांच्या मान्यतेनंतरही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून वगळण्यात आला. चित्रपटांवरून होत असलेल्या या वादामुळे देशातील कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.