संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला एकीकडे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे काही लोकांकडून याचा विरोधही केला जात आहे. सुरूवातीपासूनच अनेक संघटनांकडून चित्रपटाला विरोध केला जात आहे. चित्रपटाची कथा माहिती नसतानाही हे लोक विरोध करत असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. आता या सर्व वादात अभिनेते प्रकाश राज यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी कोण जबाबदार आहे,’ असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून चाहत्यांना विचारला.

ट्विटरवर त्यांनी लिहिलं की, ‘चित्रपटाच्या सेटवर हल्ला करण्यासाठी, निर्मात्यांना मारहाण करण्यासाठी, सेटवर आग लावण्यासाठी, चित्रपटाचे वाद मिटवण्यासाठी स्वत:ची समिती स्थापन करण्यासाठी, चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची धमकी देण्यासाठी तुम्ही मुक्त आहात. पण ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी कोण जबाबदार आहे? मी सहज विचारतोय.’ राजकीय नेत्यांनी या चित्रपटाविषयी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी हे ट्विट केल्याचं समजतंय.

VIDEO : कपिल शर्माच्या भाचीकडून ‘फिरंगी’चं अनोखं प्रमोशन

‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादात राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. एकीकडे संजय लीला भन्साळी किंवा इतर कोणत्याही दिग्दर्शकात इतर धर्मावर सिनेमा काढण्याची किंवा त्यावर साधे भाष्य करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न गिरीराज सिंह यांनी उपस्थित केला होता. तर दुसरीकडे या चित्रपटाशी निगडीत वाद मिटवण्यासाठी इतिहासकार, चित्रपट निर्माते, सेन्सॉर बोर्ड आणि ज्या लोकांनी आक्षेप घेतला आहे त्यांची एक समिती तयार करून त्यांनी तोडगा काढावा, असं ट्विट भाजप नेत्या उमा भारती यांनी केलं होतं. ‘पद्मावती’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मिनीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंहची तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.